धने व जिरे हे आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील महत्वाचे घटक आहेत. पदार्थाना चव येण्यासाठी तर आपण हे वापरतोच पण आज आपण त्यांचे काही औषधी उपयोग बघू या.
जिऱ्याचे उपयोग
जिरे हा मसाल्याच्या पदार्थांमधील एक अविभाज्य भाग आहे. सफेद जिरे , शहाजिरे व काळे जिरे असे जिऱ्याचे ३ प्रकार आहेत. या तीन्ही प्रकारच्या जिऱ्याचे गुणधर्म जवळजवळ सारखेच आहेत. मसाल्यांमध्ये व फोडणीसाठी सफेद जिरे वापरले जातात. शहाजिरे प्रामुख्याने औषधी उपयोगासाठी वापरले जातात.
जिरे किंचित तिखट, गरम, भूक वाढवणारे आहे.जिऱ्यामध्ये अँटी ऑक्सीडेन्टची (Anti oxidant) मात्रा भरपूर असते. तसंच यामध्ये उडनशील तेल, क्युमाल्डेहाईड, फायबर, कॉपर(Copper), पॉटेशिअम (Potassium), मँगनीज, कॅल्शिअम (Calcium), झिंक (Zinc) आणि मॅग्नेशिअम (Magnesium) यासारखी मिनरल्सही आढळतात. जी शरीरातील विभिन्न भागांसाठी खूपच फायदेशीर असतात. याशिवाय जिऱ्यामध्ये अनेक व्हिटॅमीन्सही असतात. मुख्यात: Vitamin A व Vitamin C.
जाणून घेऊया जिरं खाण्याचे फायदे.
जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या पोषक तत्त्व आणि अँटी ऑक्सीडंट पचनक्षमता वाढवतात. आतड्यांना मजबूत बनवतात, आतड्यांतील जंतूंचा नाश करतात, आपल्या रोगप्रतिकारशक्तीलाही वाढवतात, त्यामुळे पोटासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात. वारंवार होणारा गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी जिरे उपयोगी आहे.
आवळ्यासोबत जिरं, ओवा आणि काळं मीठ मिसळून खाल्ल्यास भूक वाढते.तापामुळे आलेल्या जरावर जिऱ्याची पेस्ट लावतात. जिरे व सैंधव मीठ समभाग घेऊन लिंबाच्या रसात ७ दिवस भिजत घालून सुकवून ठेवा. त्याची बारीक पावडर करून सकाळ-संध्याकाळ घ्या. पोट फुगणे व पोटात गॅसेस होणे यासोबत अपचनातही उपयोगी पडते .
जिरे, हिंग व सैंधव मीठ एकत्र करून मधात व तुपात मिश्रण करून किंवा फक्त तुपात मिश्रण करून घेतल्याने उचकी बंद होते. जिरं तव्यावर हलक्या आचेवर चांगल भाजून घ्या आणि त्याची एक पोटली बनवून घ्या. मग ते थोड्या थोड्या वेळाने हुंगत राहा. असं केल्याने नाक बंद होण्याची समस्या दूर होते व शिंका येणं ही बंद होईल.
बद्धकोष्ठ दूर करण्यासाठी एक ग्लास ताकात काळ मीठं आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून प्या. पोटात जेव्हा दुखत असेल तेव्हा जिरं आणि साखर हे मिश्रण चावून चावून खा. चावल्यामुळे जिऱ्यातून जो रस निघतो, त्या रसाने लगेच फायदा होतो.मळमळत असल्यास जिर चावून चावून खावं. त्वरित बरं वाटतं.
जिरे बाळंतिणीसाठी श्रेष्ठ औषध आहे. जिरे बारीक चावून खाल्ल्याने बाळंतिण आईला दुध जास्त येते.धने व जिऱ्याची पावडर खडीसाखरेसोबत किंवा धने व जिऱ्याची पावडर पाण्यात घालून खडीसाखरेसोबत घेतल्यास अम्लपित्ताने छातीत, पोटात जळजळ होणे, आंबट उलटी येणे थांबते.
मूळव्याधीचा त्रास असल्यास भाजलेले जिरे, मिरे व सैंधव मिठ ताज्या (नुकतेच तयार केलेले) मठ्ठ्यात किंवा ताज्या ताकात मिसळून प्यावे. चांगला फायदा होतो.मेथी, ओवा, जिर आणि बडीशोप सम प्रमाणात मिसळून वाटून घ्या. हे मिश्रण एक चमचा रोज खाल्ल्याने डायबिटीज, सांधेदुखी आणि पोटाचे विकार होत नाहीत. तसंच गॅसची समस्येवरही याचा फायदा होतो.
जिऱ्याचं सेवन केल्यास कॉलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते. व याकारणानेच अनेकांमध्ये वजन कमी होण्यासाठी जिऱ्याची मदत होते.जिरे पाणी पिण्याचे फायदेरात्रीच्या वेळी 2 चमचे जिरं 1 ग्लास पाण्यात भिजवावं आणि सकाळी उठल्यावर उकळून गाळून घ्यावं. हे पाणी रिकाम्या पोटी चहासारखं गरमगरम घेतल्यास नक्कीच फायदा होतो. पाणी गाळून उरलेलं जिरं चावून खावं. याचं सेवन रोज केल्यास शरीरातील कोणत्याही भागातील अनावश्यक चरबी शरीरातून बाहेर पडेल.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
धने फायदे
घने पित्ताचे आजार असणाऱ्यांसाठी वरदान आहेत. औषधी व अन्न पदार्थांसह धने पुजेसाठीही वापरले जातात. भारतात अनेक ठिकाणी धने शुभ मानले जातात व त्यांचा पुजेच्या ताटात इतर साहित्यासोबत समावेश केला जातो. अनेक ठिकाणी शुभकार्यात शुभ मुहुर्त किंवा शुभ शकुन म्हणुन गुळ व धने वाटण्याची पद्धत आहे.धने उष्ण गुणाचे असून पाचक, अन्नाची रूची वाढवणारे, लघवी साफ करणारे, पित्ताचे सर्व विकार, अम्लपित्त, शरीरातील पित्त वाढल्याने येणारा ताप, जुलाब, शरीरातील काही विशिष्ट जंत यावर उपयोगी आहे.
धने व जिरे समप्रमाणात घेऊन बारीक करून त्याचा मसाला बनवण्यात येतो. हा मसाला प्रत्येक भाजीत वापरता येतो. धनेजिरे पावडर शरीरातील पित्त कमी करते व पाचक, रूचिवर्धक आहे. पित्ताचे सर्व आजार व शरीरात वाढलेली उष्णता यावर ही धनेजिऱ्याची पावडर खूप गुणकारी आहे.अर्धा चमचा धने, एक कप दूध व अर्धा चमचा साखर उकळून रोज सकाळी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते व पचनक्रिया सुधारते. वारंवार तहान लागत असल्यास धन्याचा खूप चांगला फायदा होतो.
रात्री एक ग्लास पाण्यात दोन चमचे धने भिजवावे व सकाळी कुस्करून पाणी गाळून घ्यावे व ह्या पाण्यात साखर व मध घालून थोड्या थोड्या वेळाने प्यावे. तापात रूग्णाच्या शरीरात उष्णता वाढल्याने वारंवार तहान लागते. अश्यावेळी धने, साखर व काळे मनुका पाण्यात भिजत ठेवावे व ७-८ तासाने चांगले कुस्करून गाळून हे पाणी घोट घोट प्यावे. मधुमेहाच्या रूग्णांनी फक्त मनुका व धन्याचं पाणी प्यावे साखर टाळावी.
शरीरात अतिरिक्त उष्णता वाढलेली असतांना रात्री पाण्यात धने भिजवावे व सकाळी कुस्करून हे पाणी रोज प्यावे शरीरातील उष्णता कमी होते. ज्यांना लघवीला त्रास होत आहे व अडकून अडकून लघवीला होत आहे अश्यांनी रोज सकाळी धन्याचा काढा प्यावा. काढा प्यायल्याने लघवी साफ होते.